कोल्हापूर प्रतिनिधी। ‘हमीभावास 50 टक्के कात्री लावून सरकारने वर्षाला 50 हजार कोटींचा शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे सरकारवरच शेतकऱ्यांचे देणे लागत आहे, आम्ही खऱ्या अर्थाने कर्जदार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 20 वर्षापूर्वीच कर्जमुक्ती दिल्याने एक दमडीही भरायची नाही,’ असे आवाहन शेतकरी संघटनेत नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. कोल्हापुरात झालेल्या कर्जमुक्त परिषदेत हा निर्धार करण्यात आला. रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू भवन येथे ही परिषद झाली. या परिषदेत राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या व्यापक भूमिका मांडत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.
‘देशातील शेतकऱ्यांनी 135 कोटी जनतेची भूक भागवून येथील देशाला निर्यातक्षम बनवले. मात्र याच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. आतापर्यंत 80 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषीप्रधान म्हणवून देशाला हा कलंक आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, तर कर्जबाजारी असल्याचा अभिमान बाळगा’, असेही रघुनाथदादा पाटील यावेळी म्हणाले. सोबतच ‘खर्चाच्या प्रमाणात हमीभाव मिळत नाही. राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेल्या हमीभावात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे वजा 72 टक्के उत्पादन खर्च झाला आहे. जोपर्यंत उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव मिळत नाही तो पर्यंत सरकारशी संघर्ष सुरुच राहिल’ असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.