कोल्हापूर । एकनाथ खडसे यांनाही सर्व प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळं त्यांनी संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्यावी, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मागील काही दिवसापासून पक्षनैतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकमागोमाग एक आरोप करत आहेत.
खडसे यांचे आरोप व अस्वस्थतेबद्दल पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘खडसे यांच्याशी पक्षातील काही मंडळींनी संवाद साधला आहे. त्यांना सर्वच प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळं त्यांनी संघर्षाची भूमिका मागे घेऊ नये. संवादाची भूमिका घ्यावी,’ असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळं त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. कालांतरानं त्यांना क्लीन चिटही मिळाली. मात्र, मंत्रिमंडळात पुन्हा त्यांचा समावेश झाला नाही. इतकेच नव्हे तर पक्षातही त्यांचे महत्त्व कमी होत गेले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षानं तिकीटही दिलं नाही. त्यामुळं खडसे प्रचंड अस्वस्थ होते. यापूर्वीही त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता.
खडसे हे आता फडणवीसांचं नाव घेऊन टीका करू लागले आहेत. ‘फडणवीस हे ड्राय क्लीनर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवू लागले आहेत. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळंच राज्यात भाजपची सत्ता आली नाही की काय, याचा मी शोध घेत असल्याचा टोलाही खडसे यांनी फडणवीसांना हाणला होता. करोनाचे वातावरण संपल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.