टीम हॅलो महाराष्ट्र : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय, अशी जोरदार टीका खासदार नारायण राणेंनी केली आहे. भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करत असल्याचे राणे यांनी सांगितले. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांबद्दल, त्यांच्या घराण्याविषयी वेडंवाकडं बोलला तर जीभ जाग्यावर राहणार नाही, याद राखा असा इशाराही राणे यांनी दिला आहे. नारायण राणे भाजप कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढविला.
शिवाजी महाराजांच्या वंशजांनी पुरावे द्यावेत असे विधान संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर राऊत याच्यावर चौफेर टीका होत आहे.आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. लोकमत पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात घेतलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांच्या वंशजांनी वंशजाचे पुरावे द्यावेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.त्यांच्या या टिकेवरून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत.