सहकारामधूनच सहकार क्षेत्र समृद्ध करण्याचा मानस – सहकारमंत्री सुभाष देशमुख

Subhash Deshmukh
Subhash Deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सतिश शिंदे

सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल, हे पाहायचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृह येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी तेे बोलत होते.

यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन पटवर्धन, आमदार जयंत पाटील, ॲड.अशिष शेलार, प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, मी मार्गदर्शन नव्हे तर सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्यात सहकार क्षेत्राची ताकद खूप मोठी आहे. जवळपास राज्याची अर्धी लोकसंख्या विविध माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे राज्यात सहकार क्षेत्र अधिक वाढले तर आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध होऊ शकतो ही भूमिका घेऊन सहकार विभाग कार्य करत आहे. आपणास महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून 5 हजार विविध सहकारी संस्थांचे बळकटीकरण करायचे आहे. त्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काम करताना चूक होते, पण जाणीवपूर्वक वारंवार चुका करू नयेत, असे सांगून श्री. देशमुख यांनी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यात अटल पणन अभियानाचा प्रामुख्याने उल्लेख केला, तसेच राज्यात सहकार रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात किमान जिल्ह्याच्या ठिकाणी हे रुग्णालय सुरू करावे, ज्याचा लाभ गोरगरिबांना होईल, त्यांचा जीव वाचेल असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात कॉपशॉप सुरु करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील सहकारी सोसायट्यांच्या मालकीची मैदाने गोरगरीब शेतकऱ्यांना आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून दिल्यास सोसायटीतील लोकांना ताजा व माफक दरात भाजीपाला व गोरगरीब शेतकऱ्यांना थेट मदत होईल, असे श्री.देशमुख म्हणाले.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून, त्यांनी उत्तम सोसायट्या व उत्तम कार्य करणाऱ्या संस्थांचा विशेष उल्लेख केला. राज्यातील उत्तम कार्य केलेल्या संस्थांना सर्वांनी भेट देऊन त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. सहकार क्षेत्र वाढीसाठी सर्व प्रमुख संस्थांच्या संचालकांनी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर किमान एक संस्था काढावी संस्थेचे संस्थापक व्हावे, असेही आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.

याप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर, जयंत पाटील, आशिष शेलार, शेखर चरेगावकर ॲड.सचिन पटवर्धन यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. चांगले कार्य करणाऱ्यांचे अभिनंदन, कौतुक करावे व इतरांना त्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, दिलीप बनकर, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील तसेच विविध क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विविध पुरस्कार विजेते

सहकारमहर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. त्यांना 1 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देण्यात आले.

विविध गटांमध्ये सहकारभूषण व सहकारनिष्ठ हे पुरस्कार देण्यात आले. त्याचे स्वरुप सहकार भूषण पुरस्कार 51 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह व सहकारनिष्ठ पुरस्कार 25 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.

गट-1 : प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था :

सहकारभूषण पुरस्कार-पुणे-अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जि.सांगली. कोकण-आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आसुद, जि. रत्नागिरी ; औरंगाबाद-अंधारी विकास सेवा संस्था, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

सहकारनिष्ठ पुरस्कार- नाशिक-शेतकरी विकास सहकारी संस्था, पिंपळगाव, जि.नाशिक.

गट-2 : नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था :

सहकारभूषण पुरस्कार -कोकण-शिवकृपा सहकारी पतपेढी, मुंबई ; पुणे-शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था, भोसरी, पुणे ; नागपूर-सेवाश्री साई नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर.

सहकारनिष्ठ पुरस्कार-अमरावती-पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, शिरसगाव कसबा, जि.अमरावती ; औरंगाबाद-औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, औसा, जि.लातूर.

गट-3 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका :

सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.लातूर.

गट-4 : नागरी सहकारी बँका :

सहकार भूषण पुरस्कार-औरंगाबाद-वैश्य नागरी सहकारी बँक म. परभणी ; कोल्हापूर- दि कोल्हापूर अर्बन को-ऑप.बँक लि., कोल्हापूर ; कोकण-चिपळूण अर्बन को-ऑप.बँक लि., चिपळूण, जि.रत्नागिरी.

सहकारनिष्ठ पुरस्कार-नाशिक-श्री स्वामी समर्थ सह.बँक मर्या., निघोज, पारनेर, जि.अहमदनगर.

गट-5 : सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दूध संघ :

सहकार भूषण पुरस्कार-साखर कारखाने-श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या.भेंडा बु. नेवासा, जि.अहमदनगर ; सूतगिरणी-चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, हातकणंगले, जि.कोल्हापूर ; दूधसंघ-राजाराम बापू सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., इस्लामपूर, जि.सांगली.

सहकारनिष्ठ पुरस्कार-दूधसंघ-पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., पुणे.

गट-6 : गृहनिर्माण सहकारी संस्था :

सहकार भूषण पुरस्कार-मुंबई-श्री श्रद्धा माता को.ऑप.हौसिंग सोसायटी, पवई, मुंबई-76 ; मुंबई-साई शिल्प को.ऑप.हौसिंग सोसायटी, मुलुंड पूर्व, मुंबई.

सहकारनिष्ठ पुरस्कार-कोकण- नवमिलन को.ऑप.हौसिंग सोसायटी लि., डोंबिवली (पूर्व), जि.ठाणे ; पुणे-रविराज सहकारी गृहरचना संस्था मर्या., वारजे, पुणे ; अमरावती-डॉ.पंजाबराव देशमुख गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., अमरावती.

गट-7 : औद्योगिक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था :

सहकारभूषण पुरस्कार-औद्योगिक संस्था-सिद्धार्थ बिडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या., पिंपळगाव, जि.भंडारा; पाणीपुरवठा-कै.अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था मर्या., व्हनाळी, साके केनवडे, जि.कोल्हापूर.

सहकारनिष्ठ पुरस्कार-इतर-आर्म्ड फोर्सेस एक्स ऑफिसर्स मल्टीसर्व्हीस को.ऑ.सोसायटी लि., 364, गोखले रोड, मॉडेल कॉलनी, पुणे-16.

गट-8 : फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था :

सहकारभूषण पुरस्कार-खरेदी विक्री-चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ लि., तुर्केवाडी, चंदगड, जि.कोल्हापूर ; प्रक्रिया-सिंदेवाडी सहकारी भातगिरणी संस्था मर्या., सिंदेवाडी, जि.चंद्रपूर

सहकारनिष्ठ पुरस्कार-ग्राहक संस्था-उमरखाडी कन्झ्युमर्स को.ऑप.सोसायटी लि., डोंगरी, मुंबई-09.