सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
कुपवाड येथील वादग्रस्त जागा हस्तांतर करण्याच्या विषयाचे इतिवृत्त पूर्ण केले नसल्याने आजच्या महासभेत जोरदार गदारोळ झाला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी इतिवृत्त पूर्ण होईपर्यंत सभा तहकूब ठेवावी, अशी मागणी केली व ते महापौरांच्या पिठासनाकडे धावले , मात्र सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर अजेंड्यावरील विषय मंजूर करत वीस मिनिटात सभा गुंडाळली. महापौरांनी पळ काढल्याचा आरोप करत विरोधकांनी भाजप व महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आजची सभा वादळी ठरली.
महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा पार पडली. सभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर मागील इतिवृत्त मंजुरीचा विषय सभेत आला. यावर विरोधी नगरसेवकांनी ठराव नको, इतिवृत्त वाचा, अशी मागणी केली. दोन महिने इतिवृत्त लिहिले नाही, आणि आता दोन तासात काय होणार? असा सवाल करत नगरसचिवांना धारेवर धरले. इतिवृत्त लिहू पर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी मात्र सभा सुरू करून इतिवृत्त पूर्ण करण्याची मागणी केली, पण सभागृहात गोंधळ वाढतच गेला.
सत्ताधारी गट नेते युवराज बावडेकर, भारती दिगडे, निरंजन आवटी यांनी अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर-मंजूर म्हणत गदारोळ केला. त्यामुळे महापौर संगीता खोत यांनी मिरजेतील आण्णाबुवा शॉपिंग सेटरमधील गाळेधारकांना वाढीव जागा देण्यासह अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करीत सभागृह सोडले. याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध केला. महापौरांनी महासभेतून पळ काढला, असा आरोप करत महापौर व सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.