टीम हॅलो महाराष्ट्र | हिंदू धर्मात अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाचे अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हा गणेशोत्सव कसा सुरु झाला त्यामागे काय इतिहास आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे आपण आज सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास जाणून घेऊ.
प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आपले वर्ष विविध सण-समारंभांशी जोडले आहे. आता साजरा होणारा गणेशोत्सव याला अपवाद नाही. अर्थात, पूर्वीच्या काळी खूप साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप आता खूप बदलले आहे. त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरणाची, जागतिकीकरणाची, भांडवलशाहीची आणि जाहिरातबाजीची बाधा झाली आहे. आताच्या सार्वजनिक उत्सवाची काहीशी बीजे आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगात दिसतात.
मध्य युगात संपूर्ण हिंदुस्थानभर ज्या मराठी सत्तेचा दबदबा होता, त्याचे प्रमुख कारभारी पेशवे हे छत्रपतींच्या अनुमतीने सत्ता गाजवत होते. त्यांचे आराध्यदैवत गणपती. शनिवारवाड्यातील गणेश महाल काय किंवा थोरले माधवराव पेशवे यांनी आपले अंतिम दिवस थेऊर येथे गजाननाच्या चरणी व्यतीत करणे काय, या गोष्टी पेशव्यांच्या राजवटीतील या दैवताचे मोठेपण स्पष्ट करणाऱ्या आहेत. पेशव्यांच्या दरबाराचे एकमेव चित्र जे उपलब्ध आहे, त्यातही गणपती स्पष्ट दिसतो.
सवाई माधवरावांच्या आयुष्यातील ज्या गोष्टी महत्त्वाच्या घडल्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव. या पेशव्यांनी या घरगुती उत्सवाला मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या न्यायाने दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. पेशव्यांचे विश्वासू पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार यांनी या उत्सवामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शनिवारवाड्यातून दशमीला फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजही त्याचप्रमाणे वाटचाल सुरू आहे.
हे पण वाचा –
गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर
सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या
बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’
गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड