कोल्हापूर प्रतिनिधी,सतेज औंधकर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसे यांचे शारीरिक संबंध होते असे सांगण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी ट्विट का केले नाही? असे सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले. तसेच तुम्ही महाशिवआघाडीतील ‘शिव’ शब्दही काढून टाकला, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते कोल्हापूरात बोलत होते.
आज के शिवाजी, नरेंद्र मोदी या प्रकाशित झालेल्या वादग्रस्त पुस्तकावर राज्यात शिवसेनेसह अन्य पक्ष, संघटनांनी निदर्शने केली. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, मुळात हे पुस्तक भाजपचं अधिकृत पुस्तक नाही. या पुस्तकाबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणा, पण त्यावरून तुम्ही भाजपावर राग का काढता? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी चोरून केलेली आघाडी राज्यात सत्तेत आहे. भाजपा ती पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्या कर्मानंच ती पडेल. ही आघाडी पाहून बाळासाहेब ठाकरे स्वर्गात रडत असतील, अशीही टीका त्यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ, सतेज पाटील या दोन्ही मंत्र्यांवर पाटील यांनी निशाणा साधला. एकेकाळी दुचाकीवरून फिरणाऱ्या मुश्रीफ यांची कारखाना उभारण्याची आर्थिक स्थिती होती का? त्यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला, त्याची माहिती उघड व्हावी. सतेज पाटील यांच्याकडे पंचतारांकीत हॉटेल उभे करण्यासाठी आर्थिक ताकद कोठून आली? दोघांनी आमच्या घरातून आमचा भाऊ चोरून नेला, त्याला आमिषं दाखवली. अशा मंत्र्यांनी आमच्यावर टीका करू नये. रात्रीनंतर दिवस उगवतो हे ध्यान्यात असू द्या. आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा शिल्लक असणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका भाजपा ताकदीने लढून यश मिळवेल, असा दावाही यावेळी पाटील यांनी केला.