सुदृढ तरुणाईबरोबरीनेच बलशाली समाज देखील घडवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । सतिश शिंदे

खेळामुळे सांघिक भावना निर्माण होऊन युवकांमध्ये विजीगुषीवृत्ती जागृत होते. सदृढ तरुणाईसह बलशाली समाज घडविण्यासाठी सीएम चषकाचा निश्चित उपयोग होणार असून राज्यातील ग्रामीण खेळाडुंच्या गुणांना वाव मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे “सीएम चषक” क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर, जगदीश मुळीक, विजय काळे, मंगलप्रसाद लोढा, योगेश गोगावले, पनवेलचे उपमहापौर विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते, सांघिक भावना वाढीला लागते. खेळाडू त्यांच्या वैयक्तिक जीवनात कधीही अयशस्वी होत नाहीत. आजच्या तरुणांना एकत्र करुन त्यांच्यात विजिगुषीवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळाची आवश्यकता आहे. तसेच आपली संस्कृती टिकावी, आजच्या युवकांपर्यंत पोहोचावी, यासाठी या कला व क्रीडा महोत्सव उपयुक्त आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील ग्रामीण भागातील खेळाडुंच्या गुणांना चालना मिळून त्यांना आपले गुण सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय खेळाडूंनी कॉमन वेल्थसह अन्य स्पर्धेत आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. येत्या ऑलिंपिक स्पर्धेत आपले खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत राज्य शासन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळात चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडुंच्या पाठिशी ठाम उभे असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानावर जाऊन क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, कुस्ती, कॅरम, १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे या खेळांचे उद्घाटन करून युवा खेळाडुंशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळात चमदार कामगिरी केलल्या नेमबाज तेजस्विनी सावंत, अर्जुन पुरस्कार प्राप्त हेमंत टाकळकर, दशरथ जाधव, श्रीरंग इनामदार या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार योगेश टिळेकर यांनी केले. तर आभार मंगलप्रसाद लोढा यांनी मानले. कार्यक्रमाला कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कला-क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment