हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सुपूर्त करावे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“जर कोणत्याही व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा करू. परंतु कृपया या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यापूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयनं हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं होतं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते’ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.