मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय आता समोर आला असून या कर्जमाफीचा फायदा २ लाख किंवा २ लाखाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील या कर्जमाफीवर नाराजी व्यक्त केली आहे. या शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी पुढील निकष लागू केले आहेत.
योजनेनुसार शेतकरी हा वैयक्तिक निकष मानला जाईल.
त्याची सर्व कर्जखाती मिळून दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे.
सरकारी नोकरदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
सरकारी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सरकारच्या विविध उपक्रम, एसटी महामंडळातील २५ हजार कमी मासिक उत्पन्न धारकांनाही हा लाभ घेता येणार आहे.