पाचगणी | राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, म्हसवड (ता. माण) या संस्थेत 1 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावली) येथील पाचजणांना अटक करण्यात आली. गणेश जगन्नाथ रोकडे (वय- 32), धर्मा राऊ गुजर (वय- 62), राहुल विठ्ठल बावकर (वय- 42), राजेंद्र आनंदा गुजर (वय- 59, सर्व रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा), नाना वामन शिंदे (वय- 73, रा. हुमगाव ता. जावली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, म्हसवड (ता. माण) या संस्थेमार्फत चेअरमन, संचालक व इतरांनी राज्याच्या सामाजिक विभागाकडून औद्योगिक प्रकल्पासाठी 1 कोटी रुपये मंजूर करून घेऊन या रकमेचा अपहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबत 30 मे 2019 रोजी म्हसवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपींचा गेल्या तीन वर्षांपासून शोध घेतला असता ते मिळून येत नव्हते.
28 नोव्हेंबर 2022 रोजी हे आरोपी कुडाळ व हुमगाव (ता. जावली) येथे येणार असल्याची माहिती गुप्त व्यक्तीमार्फत मिळाल्याने तेथे सापळा लावून कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे तसेच आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि शिवाजी भोसले यांना कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कुडाळ व हुमगाव येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, म्हसवड यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी भोसले, स.फौ. प्रमोद नलावडे, पो. ना. प्रशांत नलावडे, संजय मोरे, मनोज जाधव, संतोष राऊत, पो. कॉ. शफिक शेख, अजित पवार, प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला.