हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, गेल्या दोन दिवसात मराठा आंदोलकांनी बस फोडल्यामुळे, जाळपोळ केल्यामुळे तब्बल एक कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे परिवहन मंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे मराठा आंदोलकांनी जाळपोळ करण्यास, बस फोडण्यास, दगडफेक करण्यास, पुढाऱ्यांच्या घराला आग लावण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला,परिवहन महामंडळाने मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेडला जाणाऱ्या बसच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या आहेत. यासोबत, खबरदारी म्हणून परिवहन मंडळाने वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणाऱ्या रोजच्या 1400 बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.
सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची झळ परिवहन मंडळाला बसत आहे. कारण,मराठा आंदोलकांकडून बीडमध्ये तर शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर, अनेक बसेसला आग लावण्यात आली आहे. यामुळेच बीड, धाराशिव, मराठवाडा, जालना, नांदेड अशा अनेक जिल्हयातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर, गेल्या दोन दिवसात राज्यभरातील 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड आणि दोन एसटी बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे. परिवहन मंडळाच्या बसची तोडफोड करण्यात आल्यामुळे तसेच, या जाळपोळीमुळे तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर, अनेक जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. थोडक्यात, राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा सर्वात जास्त फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे.