सातारा | सातारा शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या ‘चक्री’ जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी गोडोली व गुरुवार परज या दोन ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईत 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रोख रकमेसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
चक्री जुगारप्रकरणी गोडोली येथे छापा टाकण्यात आला. याप्रकरणी नीलेश सुरेश पवार (रा.करंजे), सागर संतोष धोत्रे (रा. करजे पेठ), अतुल शरद पाटसुदे (रा. जुनी भाजी मंडई परिसर), योगेश पोपट मदने (रा. दिव्यनगरी), आकाराम काळुराम माने (रा. गोडोली), गणेश अनिल सोनावले (रा. जुने) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरी जुगाराची कारवाई गुरुवार परज येथे करण्यात आली. याप्रकरणी राजेश संपतराव कदम (वय ५२, रा. पिलेश्वरीनगर, करंजे), दिपक विनायक बोभाटे (वय ४५, रा. आकाशवाणी झोपडपट्टी), सतिष बाळकृष्ण साळुंखे (वय ४५, रा.गेंडामाळ, शाहूपुरी), युन्नुस शेख (रा. गुरुवार परज) या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोडोली येथे चक्री जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून गोडोली येथे छापा टाकला असता संशयितांनी पळापळ केली. पोलिसांनी परिसराला वेढा टाकला व सर्वांची धरपकड केली. पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि वंदना श्रीसुंदर, सपोनि अविनाश जगताप, पोलिस हवालदार के. ए. जाधव, अब्दुल खलीफा, संजय खाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.