फलटण | लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे (ता . फलटण) येथील एसटी थांब्या जवळ सायंकाळी अज्ञात कारणावरुन बापु संभाजी निकम (रा. शेरेचीवाडी, वय- 38) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी आरोपी सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. मयताचे मामा शामराव कोंडिबा कणसे (रा. शेरेचीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सालपे येथे घटनास्थळी लोणंद पोलिसांनी तातडीने धाव घेतली. तसेच याठिकाणी उपस्थितांच्याकडे पोलिसांनी चाैकशी केली असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या खूनप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू निकम यांचा मृतदेह पोस्टमार्टम लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. मयत बापू निकम यांना दाडक्याने मारहाण झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयताच्या डोक्यात, छातीत व हाताला मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. खूनाच्या घटनेमुळे सालपे, शेरेचीवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील तपास सपोनि विशाल वायकर तपास करीत आहेत