व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे- बंगलोर महामार्गावर 10 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बेंगलोर महामार्गावर कराड जवळ ट्रॅफिक जाम वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. गेल्या 3 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच वैतागले आहेत. कराड जवळ महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागलेल्या आहेत. आज परिक्षार्थीं विद्यार्थ्यांना या ट्रॅफिक जामचा फटका बसणार आहे.

कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा हा नेहमीचाच विषय बनला आहे. परंतु आज दहावी- बारावी परीक्षा असताना कराड शहरात मार्गावर वाहतूक जाम झाल्याने त्याचा फटका बसणार आहे. मलकापूर हद्दीत असलेला ढेबेवाडी फाटा येथील उड्डाण पूलावरून वाहतूक बंद केल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. येत्या काही दिवसात सध्या बंद केलेला ढेबेवाडी फाट्यावरील पूल पाडण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. त्या अगोदरच ट्रॅफिक जाम झाल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचे दिसून आले.

रात्री मुंबई- पुण्याहून निघालेले वाहन चालक व प्रवासी सकाळ- सकाळी कराड येथे अडकल्याचे दिसून येत आहे. सकाळी 10 वाजले तरी ट्रॅफिक न हटल्याने नोकरदार वर्गही अडकला आहे. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग यांना यांचा चांगलाच फटका बसलेला आहे. कोल्हापूर- सांगली- बेळगाव यामार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे. तर मुंबई- पुण्याला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.