हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून चंद्रपूर येथे ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते. अखेर आज हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन रविंद्र टोंगे यांना पाण्याचा घोट पाजला. यानंतर, रविंद्र टोंगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. मुख्य म्हणजे, यावेळी “ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. तसेच सरकार ओबीसी बांधवांना 10 लाख घरे देईल” अस आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महासंघाला दिलं.
त्याचबरोबर, “मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत. पण म्हणून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आम्ही आरक्षण देणार आहोत. ओबीसीसाठी 10 लाख घरे देण्याची योजना तयार केली असून सरकारला ओबीसींचे हित जपायचे आहे. तसेच ओबीसींच्या योजनेसाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल प्रवेशात 27 टक्के आरक्षण देऊन संविधानिक दर्जा दिला आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुढे बोलताना, “शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या इतरही मागण्या मान्य केल्या आहेत. सरकार ओबीसींच्या पाठी आहे. ओबीसींना जे जे आश्वासनं दिली आहेत. ती पूर्ण करणार” असं आश्वासन देखील फडणवीसांनी यावेळी दिलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असताना ओबीसी महासंघाने देखील चंद्रपूर येथे आंदोलन पुकारले होते. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी रविंद्र टोंगे यांनी सरकार पुढे ठेवली होती. यानंतर काल ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणास्थळी जाऊन रविंद्र टोंगे यांचे उपोषण मागे घेतले. तसेच, ओबीसी आरक्षणाला धक्काही लावला जाणार नाही असे आश्वासन दिले.