हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सणासुदीचे वातावरण असल्यामुळे नागरिक नवनवीन वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढलेली मागणी बघता याचा प्रचंड ताण कंपन्यांवर पडला आहे. या पार्श्वभूमीवर 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत 65 टक्के कंपन्यांनी फ्रेशर्सला संधी देण्याची तयारी दाखवली आहे. या डिसेंबर महिन्यात देशात 25% हंगामी नोकऱ्या तरुणांना मिळू शकतात. यामुळे तब्बल दहा लाख तरुणांना रोजगार मिळेल.
टीमलीज या जॉब कन्सल्टिंग फर्मच्या करिअर आऊटलुक अहवालानुसार, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अनेक कंपन्या तरुणांना रोजगार देण्याचा विचार करत आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे देशातील तरुणांना दुसऱ्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सणासुदीच्या काळामध्ये मीशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन तसेच मिंत्रा सारख्या ई-कॉमर्स मोठ्या प्रमाणात तरुणांची भरती करत आहे.
देशात सर्वात जास्त लोकप्रिय असलेली मीशो कंपनी ५ लाख तरुणांना आणि फ्लिपकार्ट कंपनी एक लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. यासोबतच ॲमेझॉनमध्ये देखील ८० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सेल्स, मार्केटिंग आणि सप्लाय चेन अशा विभागांमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तर मिंत्रा कंपनी 45 टक्के महिलांना नियुक्त करणार आहे. तसेच, टुरिझममध्ये देखील लोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील काळात देशातील दहा लाख तरुणांना रोजगार मिळू शकतो.