डहाणू : वृत्तसंस्था – डहाणू तालुक्यातील आंबोकी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिट्ठीमध्ये त्याने आई-बाबांना आणि मित्रांना भावनिक साद घातली आहे. तसेच आत्महत्या करण्यामागचे कारण देखील लिहिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून याचा तपास सुरु केला आहे.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव प्रदीप राज्या घरट असे आहे. तो तवा येथील शासकीय आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. पण लॉकडाऊन सुरू असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे त्याच्या शिक्षणात खंड पडला. तर दुसरीकडे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने मृत प्रदीप वसई शहरात कामासाठी गेला होता. या ठिकाणी त्याला व्यवस्थापकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचे त्याने चिठ्ठित नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत प्रदीपने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आई वडिलांना आणि मित्रांना भावनिक साद घालत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘आई-बाबा मला माफ करा, तुमची खूप आठवण येते, काळजी घ्या! मित्रांचीही खूप आठवण येते’ असे लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला. कासा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.