हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे, आता याच रुग्णालयात मंगळवारी आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या 35 वर पोहचली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात देखील 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी 3 डॉक्टरांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. या चौकशीत दोषी ठरलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे देखील हसन मुश्रीफ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मुश्रीफ यांच्याकडून चौकशीचे आदेश
नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर या सर्व घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी मंगळवारी मंत्री मुश्रीफ व गिरीश महाजन नांदेडमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी, “नांदेडमध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी 3 डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल” अशी माहिती दिली. त्याचबरोबर या चौकशी दरम्यान दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुश्रीफ यांनी मृत रुग्णांच्या कुटुंबियांना दिले.
पुढे बोलताना, “नांदेडमधील घटनेने शासन व प्रशासनास जाग आणली असून ही घटना घडायला नको होती. येथील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे ऑक्टोबर अखेर भरली जातील. पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार आहे. औषधे व उपकरणे खरेदी करण्याचे 40 टक्के अधिकार अधिष्ठातांना देण्यात आले आहेत” अशी माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली.
दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एका शासकीय रुग्णालयातच 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णाच्या सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असताना दुसरीकडे त्यांच्याकडून आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे की नाही? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.