हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स येथे असलेल्या ईशा फाउंडेशनच्या परिसरात आदियोगींचा पुतळा तयार करण्यात आला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापित आदियोगी शंकराचार्यांच्या मूर्तीसारखी हुबेहूब आहे.
आदियोगींच्या या पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपति जगदीप धनखर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू उपस्थित होते.
भारतीय कला, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांना चालना देण्यासाठी ईशा फाउंडेशनने आश्रमाची स्थापना केली आहे. आदियोगी शंकर यांच्या प्रतिमेचे अनावरण मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कर्नाटकातील आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
आदियोगींच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर 14 मिनिटांचा आदियोगी दिव्य दर्शनमही दाखवण्यात आला. या शोमध्ये 112 फूट आदियोगींवर व्हिडिओ इमेजिंग मॅप करण्यात आली होती. यानंतर ईशा संस्कृती आणि साऊंड्स ऑफ ईशाच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, आदियोगी दीर्घकाळ लोकांसाठी प्रेरणास्थान राहतील. आदियोगीकडे क्षणभरही पाहिलं तर एक खोल भावना जाणवते.
यावेळी बोम्मई यांनी सद्गुरु जग्गी वासुदेव यांचीही तोंडभरून स्तुती केली. ते सद्गुरू नसून नेहमीच आपले गुरू असल्याचे त्यांनी म्हंटल. त्यांचे चिंतन, अनुभव आणि कर्मे ही एका भव्य दृष्टीपेक्षा कमी नाहीत. अशी शक्तिशाली पीठे हेच परिवर्तनाचे स्रोत आहेत असं बोम्मई यांनी म्हंटल