वित्त राज्यमंत्र्यांच्या कराडमधील ITI काॅलेजचे 12 लाखांचे बिल थकित; विद्यार्थी अंधारात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील विद्यानगर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत जवळपास दीड हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. मात्र या शासनाच्या संस्थेचे गेल्या पंधरा दिवसापूर्वी महावितरण कंपनीने विज बिल थकले असल्याने लाईट कनेक्शन तोडले आहे. शासनाच्या संस्थेवर महावितरणने ही कारवाई केल्याने सध्या या संस्थेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारमय झाले आहे. वित्त राज्यमंत्र्यांच्या कराडमध्ये आयटीआय काॅलेजचे 12 लाखांचे बिल थकल्याने विध्यार्थी संतप्त झाले आहेत.

शासकीय संस्थेचे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट बिल थकलेले असताना त्याकडे नक्की दुर्लक्ष कोणी केली हा प्रश्न निर्माण होतो. ही संस्था कौशल्य विकास मंत्री यांच्या अंतर्गत येते. तर या संस्थेला निधीची तरतूद वित्त खाते करत असते, अशावेळी दोन्ही खाती सध्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडेच हे खाते आहे. त्याचबरोबर सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील ही संस्था आहे. अशावेळी या संस्थेचे लाईट बिल एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे थकली व त्याचा पाठपुरावा करण्यास कोण कमी पडले हे पाहणे गरजेचे आहे. कारण गेल्या पंधरा दिवसापासून दीड हजार विद्यार्थी केवळ लाईट नसल्यामुळे शिक्षण घेण्यापासून वंचित राहिले आहेत

यंत्रणा बंद पण स्टाफ फॅनखाली

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाईट बिल थकल्याने वीज कनेक्शन तोडले असले, तरी प्रशिक्षण संस्थेतील कार्यालयात, शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये जनरेटरचा वापर करून लाईट, फॅन, कम्प्युटरचा वापर चालू आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांना विद्युत पुरवठा केला जात नाही. प्रशिक्षणार्थींसाठी संस्थेत असलेली यंत्रे केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातून संस्थेत येत आहेत, मात्र प्रशिक्षण न घेताच शिक्षणापासून वंचित राहून पुन्हा घरी परतत आहेत. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.

सात दिवसात बिल न भरल्यास उपोषण : सागर शिवदास

औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही शासनाची संस्था आहे. पालकमंत्री व सहकार मंत्री तसेच ही संस्था ज्या खात्याच्या अंतर्गत येते, ते कौशल्य विकास मंत्री या जिल्ह्यातील आहेत. तरीसुद्धा लाईट बिल थकल्याने या प्रशिक्षण संस्थेचे कनेक्शन तोडण्यात आले आहे, हे दुर्दैव आहे. या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे आज विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या सात दिवसात आयटीआय कॉलेज येथील विज बिल न भरल्यास या ठिकाणी उपोषण करण्यात येईल.