नवी दिल्ली । लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांत मजूर, विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयं बंद असून परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी महाराष्ट्राबाहेर गेलेले अनेक विद्यार्थी विविध राज्यात अडकले आहेत. यात दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे.
दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आता घरी परत आणण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारची तयारी झाली आहे. दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणारी रेल्वे १६ मे रोजी राज्याच्या दिशेने निघणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीहून जवळपास १२०० विद्यार्थी या रेल्वेने येणार आहेत. दिल्ली ते पुणे किंवा मुंबईपर्यंत ही रेल्वे गाडी जाणार आहे.
यापूर्वी दिल्लीहून भुसावळपर्यंतच रेल्वे जाणार होती. मात्र आता विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्यापर्यंत नेण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांना आधी बसेसने दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहचवले जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांना रेल्वे गाडीत बसवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्यातील ठाकरे सरकारकडून करण्यात येणार आहे. दिल्लीहून घरी परतणारे एकूण १६०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२०० विद्यार्थी येणार आहेत. तर इतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा विनामूल्य घरवापसी राज्य सरकारने केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”