सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जत अथणी रोडवर आज सायंकाळी झालेल्या टाटा कार आणि क्रुझर च्या अपघातात १३ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील वंदना दिलीप परदेशी ही पंढरपूर येथील आहे. बाकीचे सर्व कर्नाटक राज्यातील कोहळी व बेळगाव जिल्ह्यातील महालिंगपूर येथील आहेत.
जत अथणी रोडवर आज सायंकाळी बिळुर गावाजवळ टाटा कार व कामगार वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा अपघात झाला. बिळुर येथे द्राक्षबागेतील तोडणी हंगाम सुरू आहे. कर्नाटकातील अथणी तालुक्यातील कोहळी येथील महिला मजूर बिळुर येथे कामासाठी येतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे कोहळी येथील दहा महिला मजूर कामगार वाहतूक क्रूझरमधून बिळूर येथील द्राक्षबागेत कामासाठी आले होते.
द्राक्षबागा व्यापारी घेतात आणि कामगार पुरवठा एका एजंट मार्फत बिळूर येथे आले होते. आज कामे उरकून कोहळी गावाकडे जात असताना महालिंगपूर हुन टाटा कारमधून पंढरपूर येथे जाण्यासाठी जतकडे येत असताना बिळूर गावाजवळ कोहलीकडे जाणाऱ्या क्रूझर सोबत अपघात झाला. या अपघातात टाटा कार व क्रुझर या दोन्ही वाहनातील एकूण १३ जण जखमी झाले आहेत.