हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच नव्हे तर आता महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण की, नुकतीच ठाण्यातून एका 14 वर्षीय मुलीवर टेनिस प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टेनिस प्रशिक्षकाचे नाव रवी किरण गवळी असून तो नवी मुंबई येथील रहिवासी आहे. पीडित मुलीला टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी रवी गवळी याची नियुक्ती करण्यात आली होती. खूप विश्वास दाखवून पीडित मुलीच्या कुटुंबाने या व्यक्तीची निवड केली होती. मात्र, विश्वासघात करत प्रशिक्षक रवीने मुलीला आक्षेपार्हरीत्या स्पर्श करायला सुरुवात केली. यानंतर तिला भीती दाखवत तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. ज्यावेळी ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात पीडित मुलीचे पोट दुखण्यास सुरुवात झाली, त्यावेळी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. पीडित मुलीच्या सर्व टेस्ट झाल्यानंतर ती गर्भवती असल्याची माहिती कुटुंबाला समजली.
मुख्य म्हणजे, पीडित मुलीची सोनोग्राफी केल्यानंतर उघडकीस आले की ती सात आठवड्यांची गरोदर आहे. पुढे कुटुंबाने मुलीची चौकशी केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटुंबाने जवळील पोलीस ठाण्यात प्रशिक्षक रवी विरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. तसेच त्याच्यावर लैंगिक अत्याचाराअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे मुलीच्या मनात भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आरोपी रवीचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत. तो एक स्पोर्ट शिक्षक म्हणून कोचिंग क्लासेस चालवतो. म्हणूनच त्याची निवड पिडीत मुलीला टेनिस शिकवण्यासाठी करण्यात आली होती. मात्र याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले.