नवी दिल्ली । महाराष्ट्रात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या वादानंतर राज्यातून १४५ श्रमिक रेल्वे सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यापैकी पश्चिम बंगालसाठी मागितलेल्या ४१ गाड्यांना ममता बॅनर्जी सरकारने चक्रीवादळामुळे परवानगी नाकारली असल्याने त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढा अशी विनंती रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी रेल्वे पुरेशा गाड्या देत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल इरेला पेटले होते. तासाभरात यादी द्या, लगेच व्यवस्था करतो, असे उलट आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला दिले होते. एवढेच नाही तर रात्री २ वाजल्यानंतर ट्वीट करून २ वाजेपर्यंत राज्य सरकार १२५ ट्रेनची यादी देऊ शकले नाही, असा टोलाही लगावला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १४५ ट्रेनची यादी रेल्वे मंत्रालयाला पाठवली असून रेल्वेनेही या ट्रेन सोडण्याची तयारी केली आहे.
अन्य राज्यांचा प्रश्न मिटला असला, तरी पश्चिम बंगालमध्ये ४१ श्रमिक ट्रेन पाठवण्याबाबत मात्र अद्याप अडचणी आहेत. कारण अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालने रेल्वे गाड्यांच्या प्रवेशाला मनाई केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढा असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”