हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून भाविक अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवरच भाविकांच्या सोयीसाठी पुण्यातून अयोध्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून एकूण 15 विशेष गाड्या पुण्यातून सोडल्या जातील. या गाड्या पुण्यातून अयोध्यासाठी तर दोन दिवसाला सोडल्या जातील.
जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत 15 विशेष गाड्या
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला की राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. त्यामुळे देशभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जातील. यामुळेच पुण्यातून देखील अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी राम भक्तांकडून करण्यात आली होती. या मागणीला विचारात घेऊनच रेल्वे बोर्डाने पुण्यातून 30 जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 15 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी आयोध्याला जाऊ शकतील.
दरम्यान, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतरच महाराष्ट्राच्या विविध भागातून अयोध्येपर्यंत 36 रेल्वे धावणार आहेत. या विशेष रेल्वेच्या माध्यमातून राम भक्तांना अयोध्येला जात येईल. महाराष्ट्रातून या मोहिमेची जबाबदारी संजय पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेचा एकच हेतू असेल तो म्हणजे, राम भक्तांना अयोध्येला पोहचवणे. ज्यामुळे त्यांचा आयोध्येला जाण्याचा मार्ग सोपा होईल.
रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या काळामध्ये अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून वेगवेगळ्या भागातून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.