‘या’ जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली या ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आले. या प्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले. इस्लामपूर येथील प्रकाश भोसले यांनी या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात समाजातील पंचाविरुद्ध तक्रार दाखल केली. विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार, शामराव देशमुख, अशोक भोसले, किसन इंगवले आणि विलास मोकाशी अशी तक्रार दाखल झालेल्या पंचाची नावे आहेत. हे सगळे नंदीवाले समाजाचे पंच आहेत.

30 दाम्पत्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव
राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले. या बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला जात नाही. यामुळे 150 दाम्पत्यांपैकी 30 दाम्पत्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेशी संपर्क साधून बहिष्कार उठविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय
या 30 दाम्पत्यांच्या तक्रारीवरून अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या लोकांनी काही पंचांशी संपर्क साधून हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावेळी पंचानी हा बहिष्कार मागे घेत असल्याचे कबुल केले. मात्र त्यानंतर पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे 9 जानेवारी रोजी झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पीडित प्रकाश भोसले यांनी त्त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

Leave a Comment