हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने होळीपूर्वी LIC कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 17 टक्के वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून महागाई भत्त्यात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता LIC कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही वेतन वाढ 1 ऑगस्ट 2022 पासून लागू असणार आहे. तसेच , या निर्णयामुळे एलआयसीवर दरवर्षी 4000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
1 लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ
मुख्य म्हणजे, सरकारच्या या घोषणेनंतर पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्के वाढ झाल्यानंतर एलआयसीवर दरवर्षी 4000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याचबरोबर, याचा लाभ 1 लाख कर्मचारी आणि 30 हजार पेन्शनधारकांना मिळेल. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जात आहे.
दरम्यान, सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या पाठोपाठ अनेक राज्यांतील सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशसह अशा अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. हे सर्व निर्णय सरकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेत आहे. त्यामुळे विरोधक यावर टीका करताना ही दिसत आहेत.