पुणे मार्गावर धावल्या 180 खासगी शिवशाही बसेस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विविध मार्गांवर धावणारे लालपरी ठप्प झाली आहे. औरंगाबादेतून पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे या मार्गावर मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने खाजगी शिवशाही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 14 नोव्हेंबर पासून आतापर्यंत महामंडळाच्यावतीने 180 खासगी शिवशाही बसेस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. यातून खासगी शिवशाहीने पंधरा दिवसात महामंडळाला तब्बल 30 लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी 14 नोव्हेंबरपासून खाजगी शिवशाही सुरू केली होती. या शिवशाही बसला प्रवाशांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे मार्गावर दररोज 12 ते 15 खाजगी शिवशाही प्रवाशांना घेऊन धावत आहे. त्यामुळे या बसला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न दर रोज मिळत आहे.

पुणे मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांकडून प्रतिदिन प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता या मार्गावर आणखी बसेस वाढविण्याची तयारी एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.