हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी दारु (Poisonous Liquor) पिल्यामुळे दरवर्षी अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. हरियाणामध्ये ऐन दिवाळीच्या काळात विषारी खोपडी जागृत झाली असून दारू पिऊन दोन शहरांतील 19 जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ही विषारी दारु एवढी भयानक होती कि ही दारू प्यायल्याने सदर लोकांना अंधत्व आले असून त्यांची दृष्टी नष्ट झाली. त्यानंतर काही जणांना रक्ताच्या उलट्याही झाल्या. त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यमुना नगर पोलिसांनी या प्रकरणी सात लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे.
हरियाणाच्या अंबाला आणि यमुनानगर परिसरात गेल्या काही दिवसांत विषारी दारू प्यायल्याने 19 लोकांनी आपले प्राण गमावले. या 19 पीडीतांपैकी यमुनानगरातील 12 जणांचा तर अंबाला जिल्ह्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे. ऐन दिवाळीच्या सणात यमुनानगरातील मंडेबरी गावात एकाच दिवसात विषारी दारू प्यायल्याने 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण गावात अवकळा पसरली आहे. गावातील काही लोक अवैधपणे दारु तयार करुन विकतात. त्यांच्याकडील दारु प्यायल्यानंतर हा मृत्यूचा प्रकार घडल्याचे गावातील लोकांनी सांगितले.
रक्ताच्या उलट्या आणि अंधत्व
दारू प्यायल्यानंतर अनेक जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या तर काहींना अंधत्व येऊन डोळ्यांना दिसायचे बंद झाले. त्यानंतर गावातील लोकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. परंतु रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचे प्राण गेले. मद्यपींच्या मृत्यूस विषारी दारू जबाबदार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. यमुना नगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
दारुविक्रेत्यांना अटक
अंबालाचे एसपी जशनदीप सिंह रंधावा यांनी म्हटले आहे की बिंजलपुर गावातील दारु फॅक्टरीतून ही दारु तयार करण्यात येत असून ती परिसरातील काही ग्रामस्थांना विकली गेली आहे. या प्रकरणी यमुना नगर पोलिसांनी सात लोकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे. यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर आरोपी कॉंग्रेस पक्षांशी संबंधीत आहेत. गावात अवैधपणे दारु विक्री केल्याच्या आरोपाखाली राजकुमार, नरेश कुमार, राजेश कुमार आणि राधेश्याम यांच्या विरोधात पोलिसांनी केस दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बनावट दारूचे 200 बॉक्स जप्त
अंबाला पोलिसांनी बंद कारखान्यात बनावट दारूचे 200 बॉक्स जप्त केले आहेत. पोलिसांनी अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलेले १४ रिकामे ड्रम आणि साहित्यही जप्त केले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून यमुनानगर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.