सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
इस्लामपूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुनीर ख्वाजासाब शेख याला विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार 3 वर्षे सश्रम कारावास व दीड हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा पहिले अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांनी ठोठावली.
3 मार्च 2018 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास तिरंगा चौकाजवळ अल्पवयीन मुलगी घरी आली होती. ती घरी एकटीच असताना मुनीर शेख याने पिडीत मुलीला घराबाहेर बोलवून तुला चिकन खायला देतो, घरात बसून टिव्ही बघुया, मज्जा करूया असे म्हणत घरी बोलवले व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याबाबतची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने इस्लामपूर पोलिसात दिली होती.
या केसची सुनावणी पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांच्या कोर्टात सुरू होती. सरकारी पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पिडीत मुलगी, पंच, तपासी अंमलदार पोलिस उपनिरिक्षक कोमल पोवार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीचे गंभीर स्वरूपाचे कृत्य लक्षात घेता आरोपीला दोषी धरून 3 वर्षे सश्रम कारावास व दीड हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.