सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यातच दांडेघर तालुका महाबळेश्वर येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दांडेघर तालुका महाबळेश्वर येथील शेतकरी बाळू महादेव राजपुरे यांच्या 2 म्हशी टेबल लँड दांडेघर या परिसरात चरायला गेल्या होत्या . सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या परिसरात विजांचा कडकडाट झाला. या दोन म्हशींच्या अंगावर ही वीज कोसळली आणि दुर्दैवाने या दोन्हीबम्हशी जागीच ठार झाल्या.
गीताबाई बाळू राजपूरे या सायंकाळी म्हैशी आणण्यासाठी रानात गेल्या असता त्यांना आपल्या म्हैशी अशा प्रकारे दिसताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लागलीच ही बाब आपल्या घरी व गावातील लोकांना सांगितली. म्हशींच्या मृत्यूमुळे कुटुंबाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून महसूल विभागाने याची दखल घेवून पंचनामा करावा आणि सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.