पाथरी ता .प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून अजूनही राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण देताना सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सरकार कडे केली होती. मात्र अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासन सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय पाथरी तालुका सकल मराठा समाजाने (Pathri Taluka Sakal Maratha) घेतला आहे .शहरातील जागृत हनुमान मंदिरामध्ये घेण्यात आलेल्या सकल मराठा बांधवांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शनिवार ९ मार्च रोजी दुपारी १२ वा .च्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने शासन २६ जानेवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीला पाठिंबा म्हणुन आगामी काळात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिक्षक कॉलनीतील जागृत हनुमान मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन केले होते . यावेळी बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करणे व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात यावी हे दोन विषय मांडण्यात येऊन एकमताने ठराव संमत करण्यात आला .लोकसभेसाठी उमेदवार उभे करताना अनामत रक्कम व इतर खर्च करण्यासाठी गावागावातून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . याशिवाय राज्यातील सर्वच जागांवर उमेदवार उभे राहणार असले तरी राज्याबाहेरही विविध लोकसभा मतदारसंघात पाथरी तालुक्यातील मराठा समाजातील उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा समाजातील बांधवांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत केवळ समाजाचा व्यक्ती म्हणून राहावं अशी भूमिका मांडण्यात आली आहे . त्यासाठी राजकीय नेत्यांना गावात व घरी येण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दोन्ही विषयाच्या अंमलबजावणी साठी तालुक्यातील मराठा समाजाने कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत .रविवारी सायंकाळी सात वाजता मानवत येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या संवाद बैठकीस मोठ्या संख्येने तालुक्यातून मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे .
असा होता राज्यात चर्चा झालेला चाटे पिंपळगाव पोटनिवडणुक पॅटर्न …
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महिला राखीवच्या एका जागेसाठी २०३ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते . यातील १५५ अर्ज वैध राहीले होते . परंतु अधिक उमेदवार उभे राहिल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी एक पत्र काढत निवडणूक विभागाला ही निवडणूक रद्द करावी लागली होती . आधी मराठा समाजाला ओबीतून आरक्षण नंतर इलेक्शन अशी घोषणा देत आंदोलनाच्या भुमिकेतून एका जागेसाठी अनेक उमेदवार उभे करत शासन प्रशासनाला अडचणीत आणणारा हाच पिंपळगाव पॅटर्न लोकसभा निवडणुकीत राबवण्याचा संकल्प मराठा समाजाने केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .