नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातल्या इतर देशांमध्ये देखील आपले हात-पाय पसरले आहेत. भारतात कोरोना व्हायरस अर्थात Covid-19 च्या दोन नव्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे, यातील एक प्रकरण राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील आहे. ज्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी इटलीची यात्रा केली होती. तसेच दुसरे प्रकरण तेलंगाना मधील आहे या व्यक्तीने दुबई चा प्रवास केला होता.
चीनमधून पसरू लागलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सुमारे 89 हजार लोकांना बाधा झाली आहे. तर त्यातून तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूचे नाव कोविड -19 ठेवले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये प्रथमच या प्राणघातक संसर्गाचे निदान झाले होते आणि आतापर्यंत हे 70 देशांमध्ये पसरले आहे. कोरोना विषाणूमुळे 88,000 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, त्यापैकी एकट्या चीनमध्ये 80,000 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत.