हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय कामकाजाचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उभ्या राहतील हे घोषित केले होते. त्यानंतर आज शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
आज शरद पवार गटाकडून जाहीर झालेल्या यादीत बजरंग सोनवणे यांना बीड जिल्ह्यातून तिकीट देण्यात आले आहे. तसेच बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत शरद पवार गटाने “चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया” असे ही म्हणले आहे.
यापूर्वी शरद गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीमध्ये शरद पवार गटाने वर्धातून अमर काळे यांना, दिंडोरीतून भास्कर भगरे यांना, बारामतीतून सुप्रिया सुळे यांना, शिरुरतून डॉ. अमोल कोल्हे यांना, अहमदनगर येथून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव घोषित केल्यानंतर अजित पवार गटाने देखील लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.