औरंगाबाद प्रतिनिधी | गावातील महिलांसह नदीवर अंघोळीला गेलेल्या दोन तरुण बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील खामगाव येथे घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे वय-22 वर्षे, ऋतुजा शिवाजी कवडे वय-18 वर्षे अशी पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की,आरती आणि ऋतुजा या दोन्ही चुलत बहिणी आहेत.सध्या धोंड्याचा महिना सुरू असून नवरात्रीचा उत्सव जवळ आलेला आहे.त्यामुळे गावातील महिला रोज पहाटे नदीवर कपडे धुण्यासाठी व अंघोळीसाठी जातात. आज पहाटे गावातील आठ ते दहा महिला कपडे धुण्यासाठी खामगाव मधील नदीवर गेल्याहोत्या त्यासोबत आरती आणि ऋतुजा या देखील गेल्या होत्या.दोघी बहिणींना पाण्यात पोहोण्याचा मोह आवरला नाही. दोघीना पोहोता येत असल्याने त्या दोघी अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात उतरल्या दरम्यान महिला कपडे धुण्यात मग्न होत्या. पोहोताना त्या खोल पाण्यात गेल्या व तेथे गाळ मध्ये अडकल्या बराच वेळ झालं मात्र दोघी काही दिसत नसल्याने महिलांनी त्यांचा शोध घेतला शेवटी पाण्यात बुडल्याची शँका आल्याने महिलांनी गावातील नागरिकांना या बाबत माहिती दिली.
काही नागरिकांनी तातडीने नदीवर धाव घेत पाण्यातून दोघीना बेशुद्धवस्थेत बाहेर काढले.व रुग्णालयात हलविले मात्र तेथे वैधकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.घटनेची माहिती होताच साह्ययक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.एकाच घरातील दोन तरुणीवर काळाने घाला घातल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.