हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट .. होय हे वाचून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारांना 20 टक्के सूट देण्याची विनंती हॉटेल असोसिएशनला केली आहे. या अनोख्या ऑफर मुळे आता उत्तराखंड मध्ये मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. मात्र सध्या संपूर्ण देशात या आगळ्यावेगळ्या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणूक आयोगाने हॉटेल असोशिएशनपुढे १९ एप्रिल रोजी मतदानाचा टक्का वाढल्यास २० एप्रिल रोजी हॉटेलमध्ये २० टक्के डिस्काउंट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त विजयकुमार जोगदंडे यांनी म्हटले की, उत्तराखंडमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक संघटनांशी चर्चा सुरु आहे. हॉटेल असोशिएशनसह इतर संघटनांपुढे हा प्रस्ताव मांडला आहे. मतदान केल्यानंतर, 20 एप्रिल रोजी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना या सवलतीचा लाभ मिळेल.
याशिवाय, निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी राज्यात दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत निवडणुकीसाठी काम करणाऱ्या टीमचे कामकाज संपणार नाही, तोपर्यंत हे हेलिकॉप्टर तैनात असणार आहे. वैद्यकीय कारणासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर करता येणार आहे.
विजयकुमार जोगदंडे पुढे म्हणाले की, मतदानाच्या ४८ तास आधीपासून ते मतदान संपेपर्यंत ड्राय डे असेल. म्हणजेच या काळात सर्व दारूची दुकाने बंद राहतील. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील ज्या जिल्ह्यांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तेथे 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ड्राय डे असेल.