लखनऊ|भाजपला गत निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारे राज्य उत्तर प्रदेश. या राज्यात या वेळी भाजपची स्थिती पिछाडीवर जात असल्याचे चित्र एक्सिट पोल मधून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार विद्यमान असताना देखील येथे भाजपला एवढी निर्णायक पिछाडी का मिळते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला फक्त २२ जागा मिळणार असून गतवेळी या राज्यात भाजपने ७३ जागा जिंकल्या होत्या.
२०१४ साली झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टी फक्त ४ जागा जिंकू शकली होती. तर बहुजन समाज पक्ष तर खात सुद्धा उघडू शकला नव्हता. मात्र या निवडणुकीत सपा आणि बसपा गठबंधन सर्वाधिक म्हणजे ५६ जागा जिंकत असल्याचे चित्र एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. तसेच काँग्रेस उत्तर प्रदेश मध्ये विशेष कामगिरी करत नसून फक्त २ जागी या पक्षाची वर्णी लागणार असल्याचे देखील या एक्सिट पोल मधून स्पष्ट झाले आहे.