कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील भूस्खलन अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेमुळे हादरला आहे. खालचे आबेघर मिरगाव, ढोकावळे येथे सुमारे 33 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 21 लोकांचे मृतदेह काढण्यात प्रशासनाला यंत्रणेला यश आले आहे. रविवारी पुन्हा शोधकार्य मोहिम सुरू राहणार आहे. पाटण तालुक्यात या दुर्घटनेत अद्याप 10 ते 12 लोक बेपत्ता असल्याने एनडीआरएफच्या पथकाकडून त्यांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.
दरम्यान घटनास्थळाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसिलदार योगेश टोम्पे, पोलिस उपअधिक्षक डाॅ. रणजित पाटील यांनी भेट दिली. पाटण तालुक्यातील आंबेघर येथे भूस्खलन झाले होते या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देऊन तिथल्या लोकांचे सांत्वन करून धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असून शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आंबेघरमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून यामध्ये 15 नागरिक दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्थानिक लोक व एनडीआरएफच्या मदतीने 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिरगाव येथे एनडीआरएफच्या मदतीमदतीने आतापर्यंत 6 मृतदेह मिळाले आहेत. अजून 4 लोकांचा शोध सुरु आहे. ढोकावळे येथे एनडीआरएफची मदतीने कार्यवाही पूर्ण झाली असून तिथे 4 मृत देह मिळाले.