व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अट्टल दरोडेखोरांकडून घरफोडीचे 21 गुन्हे उघड; तब्बल 64 तोळ्यांचे दागिने ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोडेखोरांकडून तब्बल ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चाॅंद उर्फ सूरज जालिंदर पवार (वय २२, रा. काळज, ता. फलटण), पृश्वीराज युरोपियन शिंदे (वय २५, रा. ठाकुरकी, ता. फलटण), चिलम्या उर्फ संदीप महावीर उर्फ माळव्या शिंदे (वय २२, रा. सुरवडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकी समीर शेख म्हणाले की, लोणंद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी करत होते. यादरम्यान पोलिसांना अट्टल दरोडेखोर काळज, ता. फलटण गावच्या हद्दीतील बडेखान या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने दरोडेखोरांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अट्टल दरोडेखोर चाॅंद उर्फ सूरज पवार याला पकडण्यासाठी पथक तेथे गेले.

पोलिस आल्याचे पाहून सूरज पवारने धूम ठोकली. रानावनात, काटेरी झुडपात थरारक पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्याला पकडले. त्याच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांसमवेत दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. त्यामुळे पोलिसांना त्याच्याकडे अधिक चाैकशी करण्यात वेळ मिळाला. त्यानंतर सूरज पवारच्या दोन्ही साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये आणखी काही संशयित आहेत. मात्र, ते सध्या फरार आहेत. या तिघांकडून पोलिसांनी ६४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांगदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा ३५ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, दीपाली यादव, प्रवीण फडतरे, शरद बेबले, प्रवीण पवार, गणेश कचरे, फाॅरेन्सिक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, अजय जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.