हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे. तर अजून 15 जणांचा अहवाल येणं बाकी आहे.
यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमधील २१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वळसे पाटील यांच्या खासगी सचिवासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अद्याप 15 जणांचे अहवाल बाकी आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.