21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज रविंद्र देशमुख या तरुणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तालुक्यातील अनेक जण विरोधात असताना ऋतुराज सर्वांना पूरुन उरला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात त्याच्या ग्रामसमृद्धी पॅनलच्या ५ जागा निवडुन आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे गावातील ऋतुराज देशमुख या तरुणाचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा असाच आहे. इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही हेच त्याने सिद्ध करू दाखवलं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत असताना राजकारणात सक्रिय झालेला ऋतुराज अवघ्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झाला आहे. हॅलो महाराष्ट्रने यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला. राजकारणाचा वारसा वडिलांकडूनच आला असल्याचे ते म्हणाले.

वयाच्या १७ व्या वर्षी ऋतुराज यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मधून राजकारणात काम सुरु केले होते. त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. गेल्या ३-४ वर्षात खूप काम केले. मात्र मागच्या महिन्यात जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या त्यामध्ये आपल्याला डावलण्यात आले म्हणून आता लोकांच्यातून निवडून यायचे असा संकल्प त्यांनी केला. आणि या संकल्पाला केवळ प्रचारच नाही तर प्रयत्नांची जोड त्यांनी दिली. निवडणुकीसाठी पॅनल उभं करत असताना त्यांनी संकल्पसिद्धीचा वचननामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये गावाच्या शाश्वत विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले. यातील सर्वात आव्हानात्मक आणि आश्वासक मुद्दा हा सोलार व्हिलेजचा आहे. ज्यावर त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच काम सुरु केले आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीला त्यांनी एक प्रेझेंटेशन सादर केले असून आपल्या सीएसआयआर फंडातून कंपनीने दीड कोटी रुपये देणार असल्याचे मान्य केले असल्याचे ते सांगतात.

ऋतुराज देशमुख म्हणतात की, गावातील वयस्कर मंडळी सरकारी कार्यालयांमध्ये सतत फेऱ्या मारू शकत नाहीत त्यामुळे जर गावचा विकास करायचा असेल तर तरुणांनी राजकारणात येणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण उमेदीने या निवडणुकीत उभे राहिलो. आणि प्रयत्नांना यश येत पॅनल मधले ५ उमेदवार निवडून आले. आता इथून पुढे गावचा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वत विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते सांगतात. आमचे गाव हे नदीकाठी असून शेतीत प्रयोग करण्यासाठी भरपूर संधी आहे त्यामुळे आपण सेंद्रिय तसेच गटशेतीचे प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गावातील महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही ते सांगतात.

२१ व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य होत सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान मिळविलेला ऋतुराज हा राजकारणात येऊ पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक आदर्श ठरला आहे. तरुणांची एक नवी फळी नव्याने राजकारणात आकाराला येत असल्याचे एकूण वातावरण सध्या दिसते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment