आजाराला कंटाळुन तरुणाची आत्महत्या,दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मायग्रेनच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याचे दोन महीन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याने रविवारी दुपारी पावणेचार वाजता आपले वडील व मामांच्या डोळ्यासमोर शिवाजी उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे प्रकरण
मृत तरुणाचे नाव इमरान खान अकिख खान असे आहे. इमरान हा एमआयडीसीत कपाट बनविण्याच्या कारखान्यात कामाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याला मायग्रेनचा त्रास सुरू झाला होता. मायग्रेनच्या त्रासाला तो खूप वैतागला होता. रविवारी दुपारी १२ वाजता त्याने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर त्याचे डोके दुखू लागल्याने त्याची चिडचिड झाली.यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत भांडण करुन बाहेर पडला.तेव्हा त्याने आपण पुन्हा घरी येणार नाही असे सांगितले होते. इमरान रागात बाहेर पडल्यामुळे कुटुंबीय देखील टेन्शनमध्ये आले होते. यानंतर या तरुणाचे मामा आसिफ शेख अब्दुल गफ्फार आणि वडील अकील खान हे दोघे त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडले.

हे दोघेजण जेव्हा शिवाजी उद्यानात पोहोचले तेव्हा इमरान हा वापरात नसलेल्या एका विहिरीच्या कठड्यावर उभा होता. तो विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत असताना वडील व मामा यांनी आवाज देऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ऐसा मत कर, सब ठीक हो जायेंगा. असे त्यांनी इमरानला सांगितले पण इमरानने काही क्षणात त्याचे मामा व वडील यांच्यासमोर विहिरीत उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्याचे वडील व मामा यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी विहिरीजवळ धाव घेत इमरानला वाचवण्यासाठी आरडा-ओरड सुरु केली. यानंतर पंधरा मिनीटातच महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधमोहीम सुरु केली. जवळजवळ दोन तासाच्या प्रयत्नानंतर इमरानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. इमरान याच्या माघारी आई सुगराबी, वडील अकील खान, बहिण व पत्नी हिनाबी असा परिवार आहे. इमरानचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याचे आईवडीलदेखील आजारी असतात.