कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात पावसाने चांगली सूरूवात केली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातसह कोयना, नवजा, महाबळेश्वर, जावली येथे ही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर उत्तर कोरेगाव भागातही पेरणीयोग्य पाऊस पडू लागला आहे. पाटण, महाबळेश्वर तालुक्यासह डोंगर- दऱ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. वेण्णा लेकही भरून वाहू लागला आहे. तर कोयना धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.24 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 76 मिलिमीटर, नवजा येथे 89 तर महाबळेश्वर येथे 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 25.24 (24 टक्के) टीएमसी पाणीसाठा असून 20.11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात 24 तासात 2.19 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर गेल्यावर्षी याच दिवशी कोयना धरणात 41. 35 टीएमसी पाणीसाठा साठलेला होता.
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कोयना धरणासह अनेक भागात समाधानकारक हजेरी लावली आहे. शेतीला उपयुक्त पाऊस पडत असल्याने शेतकरी पेरण्या करताना दिसून येत आहे. दुष्काळी भागातही शेतकऱ्यांना समाधान देणारा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील उरमोडी, धोम धरणातही चांगला पाऊस पडत आहे. तर ढेबेवाडी विभागातील महिंद धरण अोव्हर फ्लो झालेले आहे.