कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील सुर्ली घाटाजवळील राजमाचीच्या तलावात सांबर पाणी पिण्यास गेले होते. यावेळी सांबरास भटक्या 25 ते 30 कुत्र्यांनी घेरून हल्ला केला. या हल्ल्यात सांबरावर एकाचवेळी सर्व कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र, धाडसाने कराड येथील अमोल भोकरे याने कुत्र्यावर दगडफेक करत सांबराला कुत्र्यांपासून जीवदान दिले.
वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, कराड येथील अमोल भोकरे याने मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे याना फोन केला. घटनेचे गांभीर्य ओळखून रोहन भाटे व हेमंत केंजळे हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. तेथे पोचलेल्या वन मजूर सुरेश शिंदे, वन्यजीव अभ्यासक हेमंत केंजळे, वन्य जीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक अश्विन पाटील, भारत खटावकर, ज्योतिराम देशमुख, व ईश्वर कांबळे व स्थानिक नागरीक ज्योतीराम देशमुख यांनी अर्धातास मदत कार्य राबवत सांबराला सुरक्षितरित्या बाहेर काढले. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडलेले आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार झाले, मात्र पुढील उपचारासाठी सांभराला पुण्याला हलवले आहे.
राजमाचीच्या तलावातून बाहेर काढलेल्या सांबराला थेट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डॉ. राहूल धडस व डा. बोर्डे यांनी सांभरावर उपचार केले. जखम खोल असल्याने सांभराला पुढील उपचाराला पुणे येथे हलविण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे, असे वन्यजीव रक्षक भाटे यांनी सांगितले.