हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सरकार कडून अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटींची घोषणा केली. त्यांनतर सभागृहात सर्वत्र संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला
अजित पवार म्हणाले, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकतृत्वाला साजेसे असे त्यांचे स्मारक वढू बुद्रुक व तुळापूर ता. हवेली या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी शासनाकडून 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे असे अजित पवार म्हणाले