हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालामधील कोलकाता शहरातील बिजॉयगड परिसरामध्ये एका अभिनेत्रीवर तिच्याच फ्लॅट मध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या २६ वर्षीय अभिनेत्रीवर ओळखीच्या इसमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने या अभिनेत्रीच्या घरातच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या प्रकरणात अभिनेत्रीने ८ जुलै रोजी जादवपूर पोलीस स्थानकामध्ये बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. यानंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जुलै रोजी एक ओळखीची व्यक्ती या अभिनेत्रीच्या घरी आर्थिक मदत मागण्यासाठी आली होती. ती घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. मी घरात एकटीच राहते असं या अभिनेत्री आपल्या तक्रारीमध्येही नमूद केलं आहे. या तरुणीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओही या व्यक्तीने रेकॉर्ड केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासंदर्भात कुठे वाच्यता केल्यास हा व्हिडिओ आपण व्हायरल करु अशी धमकी या व्यक्तीने दिल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. या धमकीला घाबरुन प्रसंग घडल्यानंतर काही दिवस ही अभिनेत्री पोलिसांकडे आली नव्हती. अखेर ८ जून रोजी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी ही अभिनेत्री आपल्या मूळ गावापासून लांब कोलकत्यामध्ये एकटीच राहत होती. ज्या व्यक्तीने बलात्कार केला ती व्यक्ती या अभिनेत्रीच्या ओळखीची असल्याचे सांगण्यात आले आहे. काही काळापूर्वी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फेसबुकवरुन या मुलाने अभिनेत्रीला संपर्क केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आधी तिने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र नंतर या तरुणाने लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाल्याने मदत हवी असल्याचं या अभिनेत्रीला सांगितलं. या अभिनेत्रीने या मुलाला पैसे घेण्यासाठी घरी बोलवलं. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या प्रकरणामध्ये तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.