औरंगाबाद – शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या 260 गोळ्या (बटण) आढळून आल्या. गुरुवारी शहरातील सिटी चौक पोलिसांनी अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यज मंजूर या आरोपीला अटक केली आहे.
आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता 13 स्ट्रीपमध्ये 260 गोळ्या आढळून आल्या.
अधिक माहिती घेतली असता आरोपी मंजूरकडे असलेली चारचाकी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांचे भाऊ सय्यद मोसीन यांची असल्याचे समोर आले. मंजूरकडे त्यांची गाडी कशी आली, नशेच्या गोळ्यांसाठी त्याने ती काप वापरली, कुणाच्या सांगण्यावरून वापरली, यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.