हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. अवघ्या सात दिवसात मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. घरदार सोडून मुंबईकरांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या सात दिवसात मुंबईत 279 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या रविवारी एका पीएसआयचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 11 एप्रिलपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 7997वर गेली होती. त्यापैकी 7442 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या 454 पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 101 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आतापर्यंत मुंबईतील 70 टक्के पोलिसांना कोरोना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. 11 एप्रिलपर्यंत 30,756 पोलिसांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यात 2690 पोलीस अधिकाऱ्यांचा आणि 28,066 पोलीस शिपायांचा समावेश आहे. जवळपास 17351 पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात 1325 पोलीस अधिकारी आणि 16,026 पोलीस शिपायांचा समावेश आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत 6 हजार 905 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 हजार 37 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 36 जणांचा काही दीर्घ आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे. नव्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवसांवर येऊन ठेपलाय. 5 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा 1.89 टक्के झाला आहे.
राज्यात काल दिवसभरात 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचली आहे. त्यातील 28 लाख 34 हजार 473 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.