कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री, वाहतुक करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये 26 जणांवर गुन्हे दाखल करून 28 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख 83 हजार 544 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याने अवैध दारू विक्री व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे विभागीय आयुक्त वाय. एम. पवार यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क साताराचे अधीक्षक अनिल चासकर यांचे सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क कराडच्या पथकाने मार्च व एप्रिल 2021 ह्या दोन महिन्यात अवैध दारूची विक्री व वाहतुक करणार्या 26 जणांवर गुन्हे दाखल करून त्यामध्ये 28 जणांना अटक करून त्यांच्याकडून 308 देशी दारूची बॉक्स, 154 लिटर ताडी, नऊ दुचाकी, एक रिक्षा असा 5 लाख 83 हजार 544 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराडचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, आर. एस. खंडागळे, सहाय्क दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, जवान व्ही. व्ही. बनसोडे, एस. आर. बक्केवाड, जे. एस. माने, बी. एस. माळी यांनी केली. यापुढेही लॉकडाऊन कालावधीमध्ये ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे निरीक्षक आर. एस. पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group